अनाहत भाग 1 - गौरी हर्षल




कालगर्भ

अनाहत 

भाग १: 'धूप-छाव' ऑर्डर


मुंबईतील  एका टोलेजंग टॉवरच्या विसाव्या मजल्यावर राहणाऱ्या वैदर्भी  कुलकर्णीसाठी तिची सकाळ कधीच शांत नसायची. वय वर्ष २६, दिसायला सुशिक्षित, तीक्ष्ण डोळे आणि चेहऱ्यावर एक आधुनिक कॉर्पोरेट आत्मविश्वास. 


वैदर्भी  एक फॅशन इन्फ्लुएन्सर आणि डिझायनर होती. तिचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स होते. 'ब्रँड वैदर्भी ' हे तिचं स्वतःचं लेबल होतं. तिची जगण्याची व्याख्या अगदी साधी आणि प्रॅक्टिकल होती— जे डोळ्यांना दिसतं, ज्याची किंमत मोजता येते आणि जे इन्स्टाग्रामवर 'ट्रेंड' होऊ शकतं, तेच खरं! देव, धर्म, अध्यात्म या गोष्टी तिच्यासाठी फक्त 'आजीच्या गोष्टी' होत्या.


"वैदर्भी , आज संध्याकाळपर्यंत त्या नवीन एथनिक कलेक्शनचे फोटोज अपलोड झाले पाहिजेत. क्लायंटचा सारखा फोन येतोय," तिची असिस्टंट रियाने केबिनमध्ये येत फाईल टेबलवर ठेवली.


"डोन्ट वरी रिया, मी काहीतरी एकदम युनिक शोधतेय. आजकालच्या मुलींना काहीतरी ऑथेंटिक हवंय. ट्रेडिशनल पण ग्लॅमरस," वैदर्भी ने लॅपटॉपवर स्क्रोल करत उत्तर दिले.


दुपारचे तीन वाजले होते. वैदर्भी  वेगवेगळ्या विंटेज वेबसाइट्सवर काहीतरी वेगळं शोधत होती. अचानक तिच्या लॅपटॉप स्क्रीनवर एक जुनी, दुर्लक्षित वाटणारी वेबसाईट ओपन झाली— 'मराठा हेरिटेज स्टोअर'. त्या वेबसाईटचा लूक अगदी जुन्या काळातील वाड्यासारखा होता. वैदर्भी ची बोटे कीबोर्डवर थांबली. तिची नजर स्क्रीनवर असलेल्या एका फोटोवर खिळली.


तो फोटो एका साडीचा होता. 'अस्सल हातमागावरील धूप-छाव पैठणी साडी'. एका बाजूने ती जांभळी वाटत होती, तर प्रकाशाचा कोन बदलताच ती गर्द पोपटी रंगाची भासत होती. तिचा पदर अस्सल सोन्याच्या जरीने विणलेला होता आणि त्यावर अत्यंत सुबक नक्षीकाम केलेले मोर होते. साडीचे वर्णन खाली लिहिले होते: 'अठराव्या शतकातील पेशवाई काळातील विणकाम. एक अप्रतिम कलाकृती, जी फक्त कापड नाही तर भावना आहे.'

त्या साडीची किंमत होती— ४९,९९९ रुपये.

फॅशन डिझायनर असल्याने वैदर्भी ला कपड्यांची पारख होती. साडी जुनी होती, पण तिची चमक अजूनही तशीच होती. काहीतरी अनाकलनीय ओढ वैदर्भी ला जाणवली. तिचे हृदय नेहमीपेक्षा थोडे वेगाने धडधडू लागले. तिने विचार केला, "हे कलेक्शन जर मी माझ्या पेजवर री-क्रिएट केलं, तर इंटरनेटवर धुमाकूळ निर्माण होईल." तिने जास्त विचार न करता क्रेडिट कार्ड काढले आणि साडी ऑर्डर केली. 'ऑर्डर सक्सेसफुल' असा मेसेज स्क्रीनवर फ्लॅश झाला. ११ जून २०२५.

"चला, एक काम झालं," वैदर्भी  स्वतःशीच पुटपुटली आणि कॉफीचा मग घेण्यासाठी उठली. पण ती उठताच, तिला जाणवले की तिच्या वातानुकूलित (AC) केबिनमध्ये अचानक कुठूनतरी तुळशीचा आणि ओल्या मातीचा मंद सुगंध पसरला आहे. तिने आजूबाजूला पाहिले, पण तिथे कुठलाही परफ्युम किंवा रूम फ्रेशनर नव्हता. तिने तो भास समजून सोडून दिला.


दोन दिवसांनंतर, संध्याकाळी साडेसात वाजता वैदर्भी च्या फ्लॅटची बेल वाजली. कुरिअर बॉयने एक मोठा, लाकडी बॉक्स तिच्या हातात दिला. बॉक्सवर जुन्या धाटणीची मोहर उमटवली होती. वैदर्भी  बॉक्स घेऊन तिच्या बेडरूममध्ये आली. तिने उत्सुकतेने तो बॉक्स उघडला.


आत निळ्या रंगाच्या मखमली कपड्यात ती पैठणी गुंडाळलेली होती. वैदर्भी ने हळूवारपणे तो मखमली कपडा बाजूला केला आणि साडी हातात घेतली. साडी हाताला लागताच वैदर्भी च्या अंगावर सरसरून काटा आला. जणू काही तिच्या हाताच्या बोटांमधून एक हलका, सुखावह विजेचा प्रवाह तिच्या शरीरात शिरला. साडी खरोखरच अप्रतिम होती. 'धूप-छाव' रंग प्रकाशात चमचमत होता.


पण सर्वात जास्त तिचे लक्ष वेधून घेतले ते त्या साडीच्या पदराने. पदरावर विणलेले मोर इतके जिवंत वाटत होते, जणू ते आत्ताच थुईथुई नाचू लागतील. वैदर्भी ने साडी जवळून न्याहाळली. पदराच्या अगदी मध्यभागी एक मोठा मोर विणला होता. त्या मोराच्या दोन्ही डोळ्यांच्या जागी मौल्यवान खडे बसवण्यासाठी जागा केली होती. डाव्या डोळ्यात एक लहान, चमकणारा हिरवा 'पाचूचा मणी' (Emerald) घट्ट बसवला होता. पण जेव्हा वैदर्भी ने मोराच्या उजव्या डोळ्याकडे पाहिले, तेव्हा ती थबकली.


उजवा डोळा रिकामा होता. तिथला धागा सुटलेला होता आणि तो भाग अपूर्ण होता. तिथे मणी नव्हता.

"इतकी महागडी साडी आणि तीही डिफेक्टिव्ह?" वैदर्भी ला थोडा राग आला. तिने त्या वेबसाईटवर रिटर्न किंवा एक्सचेंज पॉलिसी चेक करण्यासाठी लॅपटॉप उघडला, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ती 'मराठा हेरिटेज स्टोअर' नावाची वेबसाईट आता इंटरनेटवर कुठेच सापडत नव्हती. 


गुगलवर 'Error 404: Page not found' असा मेसेज येत होता.


"असं कसं होऊ शकतं?" वैदर्भी ने कपाळावर हात मारला. तिने चिडून ती साडी बेडवर टाकली. रागाच्या भरात ती फ्रेश व्हायला बाथरूममध्ये गेली.


रात्रीचे ठीक पावणेतीन वाजले होते. संपूर्ण मुंबई शहर झोपले होते. वैदर्भी च्या आलिशान बेडरुममध्ये पूर्ण शांतता होती. अचानक, त्या शांततेत एक अतिशय बारीक, लयबद्ध आवाज येऊ लागला.

छनक... छनक... छनक...

तो आवाज पैंजणांचा नव्हता, तो आवाज होता टाळांचा आणि चिपळ्यांचा. जणू काही अंतरावरून कोणीतरी विठ्ठलाचे भजन म्हणत चालले आहे.


वैदर्भी ची झोप उडाली. तिने दचकून डोळे उघडले. तिचे हृदय छातीत जोरजोरात धडधडत होते. तिने बेडशेजारी असलेला लॅम्प चालू केला. खोलीत पिवळा प्रकाश पसरला. आवाज थांबला होता. तिने एसी बंद केला आणि खिडकीबाहेर पाहिले.  रस्त्यांवर फक्त शांतता होती.


"मला भास होतोय बहुधा. अति कामाचा ताण आहे," ती स्वतःला समजावत पुन्हा झोपण्यासाठी वळली. पण बेडवर पडताच तिची नजर बाजूच्या खुर्चीवर पडली, जिथे तिने ती पैठणी साडी ठेवली होती.


अंधाऱ्या खोलीत, लॅम्पच्या प्रकाशाशिवाय, त्या साडीच्या पदरातून एक मंद, निळसर प्रकाश बाहेर पडत होता. तो प्रकाश त्या अपूर्ण राहिलेल्या मोराच्या उजव्या डोळ्यातून, म्हणजेच त्या रिकाम्या धाग्यामधून येत होता. खोलीत पुन्हा एकदा तोच तुळशीचा आणि चंदनाचा तीव्र सुगंध पसरला. वैदर्भी च्या छातीवर अचानक एक अनाकलनीय दडपण आले. तिला श्वास घेणे जड जाऊ लागले. ती उठली आणि संभ्रमात, भीतीने त्या साडीच्या जवळ गेली.

तिचा हात नकळत त्या साडीच्या पदराला लागला. आणि...

झंझावात!


तिच्या डोळ्यांसमोर संपूर्ण खोली गरगर फिरू लागली. प्रभादेवीचा तो फ्लॅट, लॅपटॉप, फ्लॅटच्या खिडकीतून दिसणारी मुंबईची विस्तीर्ण क्षितिजरेषा... सर्व काही सेकंदात नाहीसे झाले. तिच्या कानात आता टाळांचा आवाज तीव्र झाला होता, सोबत एका पुरुषाचा गोड, आर्त आवाज ऐकू येत होता— "पुंडलिक वरदे हरी विठ्ठल..."


तिचे डोळे पांढरे झाले आणि ती खुर्चीवरच कोसळली.

जेव्हा वैदर्भी ने डोळे उघडले, तेव्हा ती मुंबईत नव्हती.

भोवताली सिमेंटच्या भिंती नव्हत्या, तर मातीचे आणि दगडांचे जुने कुडाचे घर होते. एका कोपऱ्यात जुना, लाकडी हातमाग (Handloom) ठेवला होता. हवेत सुताचा आणि भुईमुगाच्या तेलाच्या दिव्याचा वास होता. बाहेर धो-धो पाऊस पडत होता.


तिने स्वतःकडे पाहिले. तिचे टी-शर्ट आणि जीन्स गायब होते. तिच्या अंगावर नऊवारी साडी होती, हातात हिरव्या बांगड्या होत्या आणि गळ्यात एक साधी तुळशीची माळ होती. ती स्वतःच्याच हातांकडे पाहत राहिली, तिच्या हातावर डिझायनर घड्याळाऐवजी मेहंदीचे जुने डिझाइन होते.

"रुक्मिणी..." मागे एक अत्यंत शांत आणि प्रेमळ आवाज आला.


वैदर्भी ने चमकून मागे पाहिले. हातमागासमोर एक २५-२६ वर्षांचा तरुण उभा होता. अंगावर साधा पांढरा कुर्ता, कपाळावर गोपीचंदनाचा टिळा आणि डोळ्यांमध्ये अथांग शांतता. 


त्याच्या हातात हुबेहूब तीच 'धूप-छाव' पैठणी साडी होती, जी वैदर्भी ने ऑनलाईन ऑर्डर केली होती. पण ती साडी आता अगदी नवीन आणि चमकदार दिसत होती.


"बघ रुक्मिणी, तुझ्यासाठी ही पैठणी विणतोय. प्रत्येक धाग्यासोबत त्या विठूरायाचं नाव घेतलंय ग. या आषाढी वारीला आपण दोघं पंढरीला जाऊ, तेव्हा तू हीच पैठणी नेसून माझ्यासोबत विठ्ठलाच्या चरणी दर्शन घेशील," तो तरुण डोळ्यात स्वप्न घेऊन हसत बोलत होता. त्याच नाव 'विठ्ठलदास' होतं.


वैदर्भी  काही बोलणार, तोच बाहेरून अचानक घोड्यांच्या टापांचा आणि माणसांच्या आरडाओरड्याचा आवाज आला.

"विठ्या! बाहेर नीघ! सावकाराची मुलगी चोरून आणतोस व्हय साल्या?" एक क्रूर आवाज घुमला.

विठ्ठलदासचा चेहरा भीतीने पांढरा पडला. त्याने ती अपूर्ण पैठणी घाईघाईने एका लाकडी पेटीत ठेवली. पेटी बंद करताना, साडीच्या पदरावरील मोराचा उजवा डोळा अजून विणायचा बाकी होता, सुई-धागा तिथेच लटकत होता.


"रुक्मिणी, तू मागच्या दाराने पळ! मी यांना सांभाळतो. वारीत भेटू... पंढरपुरात!" विठ्ठलदासने तिचा हात पकडला. त्याच्या हाताचा स्पर्श वैदर्भी ला इतका परिचित वाटला, जणू ती त्याला जन्मोन्जन्मी ओळखत होती.


बाहेरून दरवाजा जोरात तुटला. हातात तलवारी आणि मशाली घेतलेली काही माणसे आत घुसली. एका माणसाने विठ्ठलदासच्या छातीवर थेट तलवारीने वार केला.


"विठ्ठल!!!" वैदर्भी च्या (रुक्मिणीच्या) तोंडातून किंकाळी फुटली. रक्त जमिनीवर सांडले. विठ्ठलदास जमिनीवर कोसळला, त्याचे डोळे रुक्मिणीकडेच पाहत होते. मरतानाही त्याचा हात त्या लाकडी पेटीकडे जात होता, जिथे ती अपूर्ण पैठणी ठेवली होती.


"विठ्ठल!!!" वैदर्भी  जोरात ओरडत बेडवरून उठली. बाहेर सकाळचे ६ वाजले होते. मुंबईत पावसाची हलकी सर सुरू होती. ती घामाने पूर्ण भिजली होती, तिची छाती धडधडत होती.

तिने घाबरून आजूबाजूला पाहिले. ती तिच्याच प्रभादेवीच्या बेडरूममध्ये होती. समोर ती पैठणी साडी खुर्चीवर तशीच पडली होती. रात्रीचा तो निळा प्रकाश आता नव्हता.


"काय होतं हे? स्वप्न? मागचा जन्म? नाही, हे शक्य नाही. मी जास्त विचार करतेय," वैदर्भी ने डोक्याला हात लावला. ती बेडवरून उठली आणि पायऱ्यांवरून चालत हॉलमध्ये आली. तिने पाण्याचा ग्लास घेतला आणि प्यायली. स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत तिने कपाटाच्या काचेमध्ये स्वतःचा चेहरा पाहिला.

तिचा श्वास जागच्या जागी रोखला गेला. काचेमध्ये दिसणारा तिचा चेहरा तिचाच होता, पण तिच्या गळ्याकडे पाहताच तिचे डोळे विस्फारले.


वैदर्भी च्या गळ्यात कोणतीही चेन नव्हती, पण तिच्या गोऱ्या मानेवर काळ्या रंगाच्या सुताच्या तुळशी माळेचे स्पष्ट, गडद वळ  उमटले होते, जणू कोणीतरी रात्रभर तिच्या गळ्यात ती माळ घट्ट आवळली होती. आणि त्याहूनही धक्कादायक गोष्ट म्हणजे, तिच्या हाताचे तळवे सुताचे धागे ओढल्यासारखे सोलवटलेले होते आणि त्यातून मंद “तुळशीचा सुगंध” येत होता.

तिने धावतच बेडरूम गाठली आणि ती पैठणी साडी हातात घेतली. 


साडी काल रात्रीसारखीच जुनी आणि डिफेक्टिव्ह दिसत होती. वैदर्भी ने मागचा-पुढचा विचार न करता तिचा फोन उचलला आणि त्या ऑनलाईन ऑर्डरच्या मेसेजमधील कुरिअर कंपनीचा नंबर डायल केला.

"हॅलो, मी वैदर्भी  कुलकर्णी बोलतेय. दोन दिवसांपूर्वी मला 'मराठा हेरिटेज स्टोअर'कडून एक पार्सल आलंय. मला त्या सेलरचा पत्ता किंवा फोन नंबर हवाय, प्लीज."


पलीकडून कस्टमर केअरच्या मुलीने सिस्टीममध्ये चेक केले आणि म्हणाली, "मॅडम, तुम्ही दिलेला ऑर्डर आयडी आमच्या सिस्टीममध्ये दाखवत नाहीये. आणि 'मराठा हेरिटेज स्टोअर' नावाचा कोणताही ब्रँड आमच्याकडे रजिस्टर्ड नाही. पण..."


"पण काय?" वैदर्भी ने घाईने विचारले.


"मॅडम, त्या पार्सल ट्रॅकिंगच्या जागी डिजिटल पत्ता नाही, पण एक जुनी नोट लिहिलेली आहे. तिथे लिहिलंय— 'पत्ता: विठ्ठलदास विणकर, वासुदेव गल्ली, वाई, जिल्हा सातारा.' मॅडम, हे खूप विचित्र आहे, आजकालच्या सिस्टीममध्ये असा पत्ता कसा काय येऊ शकतो?"


वैदर्भी ने फोन कट केला. सातारा... वाई... विठ्ठलदास! तिचे हात कापू लागले. स्वप्नात विठ्ठलदासने म्हटले होते— 'या आषाढी वारीला आपण पंढरीला जाऊ...'


वैदर्भी ने कॅलेंडरकडे पाहिले. आज ११ जून होती. आणि बरोबर दोन दिवसांनी, म्हणजेच १३ जून रोजी पुण्यातून संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे, म्हणजेच आषाढी वारीचे प्रस्थान होणार होते!


तिने भीतीने साडी पुन्हा कपाटात कोंबली आणि कपाट लॉक केले. "मला कुठेही जायचं नाहीये. मी सायकायट्रिस्टकडे जाईन," ती स्वतःशीच ओरडली.

तिने ऑफिसला जाण्यासाठी कपडे बदलले. दिवसभर ती ऑफिसमध्ये काम करत राहिली, पण तिचे मन तिथे नव्हते. प्रत्येक फॅब्रिककडे पाहताना तिला तो हातमाग आठवत होता.


रात्री ती घरी आली, जेवली आणि झोपण्याचा प्रयत्न करू लागली. तिने ठरवले होते की ती साडीकडे पाहणारही नाही.


रात्रीचे पुन्हा पावणेतीन वाजले. वैदर्भी  गाढ झोपेत होती. अचानक तिच्या बेडरुममधील वातानुकूलित (AC) यंत्रणेतून थंड हवेऐवजी गरम, कोंदट हवा येऊ लागली. खोलीचे तापमान झपाट्याने वाढू लागले.

वैदर्भी ला गुदमरल्यासारखे झाले. तिने डोळे उघडले. खोलीत अंधार होता, पण कपाटाच्या दिशेने एक तीव्र लाल-निळा प्रकाश दिसत होता.

खट... खट... खट...


वैदर्भी चे डोळे भयाने मोठे झाले. तिने कपाटाला लावलेले ते जड गोदरेजचे कुलूप आपल्याआप गरगर फिरत होते आणि कपाटाचे दरवाजे हळूहळू, कोणत्याही मानवी स्पर्शाशिवाय स्वतःहून उघडत होते.

कपाटाच्या आतून ती 'धूप-छाव' पैठणी साडी एखाद्या जिवंत सापासारखी सरपटत बाहेर येत होती आणि तिचा पदर जमिनीवरून सरकत थेट वैदर्भी च्या बेडच्या दिशेने येत होता. आणि त्या शांततेत, आता फक्त टाळांचा आवाज नव्हता... तर कपाटाच्या आतून विठ्ठलदासचा तोच वेदनेने भरलेला आवाज स्पष्टपणे घुमतो —

"रुक्मिणी... वारीची वेळ झाली ग! माझा डोळा अजूनही अपूर्ण आहे... तू येत का नाहीस?"


पुढील भागात (भाग २): कपाटातून स्वतःहून बाहेर पडलेल्या साडीचे रहस्य काय? वैदर्भी  या भीतीपोटी सातारा जिल्ह्यातील 'वाई' या गावी जाण्याचा निर्णय कशी घेते? तिथे गेल्यावर तिला विठ्ठलदासच्या भूतकाळातील कोणत्या धक्कादायक गोष्टी कळतात? जाणून घेण्यासाठी वाचा अनाहत भाग २!


क्रमशः 


11 जून 2026 (एकादशी) 



नमस्कार मंडळी फक्त 8 भागांची कथा आहे आणि 4 दिवसात संपणार आहे. कारण आधीच लिहून झाली आहे. फॉलो करा सगळे भाग सलग मिळतील. रोज दोन भाग प्रकाशित होतील. 


बाकी सगळं काही दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतू!!! 


स्वतःला शोधताना - गौरी हर्षल 




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अनाहत भाग 2

अनाहत भाग 3