शापित गर्भगृह भाग 2

#कालगर्भ 
#शापित_गर्भगृह 

भाग २: पॉज झालेलं शहर

दगडी दरवाजा बंद होताना आलेला तो आवाज बराच वेळ अर्णवच्या कानात घुमत राहिला. त्याने मागे वळून धावत जात त्या पाषाणावर हात मारून दरवाजा उघडण्याचे प्रयत्न केले. पण तो दरवाजा वरच्या बाजूला असलेल्या शिवलिंगामुळे पूर्णपणे लॉक झालेला होता. वर्तमान काळाशी त्याला जोडणारा त्याचा आयफोन आणि इतर सॅटेलाईट गॅजेट्स आता फक्त नावापुरते होते. कारण तिथे त्यांना सिग्नलच नव्हता. 
आता त्याच्या मदतीला काही धावून येणार होते तर तो होता मेकॅनिकली चार्ज होणारा टॉर्च आणि त्याचा स्वतःवर असणारा विश्वास. 

“ इट्स ओके अर्णव… आपण यातून बाहेर पडू. घाबरू नकोस स्वतःवर विश्वास ठेव…”, डाव्या बाजूला छातीवर हात ठेवत तो स्वतःशीच बोलत होता. 

“ हा दरवाजा प्राचीन काळातील वास्तूकलेचे उत्तम उदाहरण आहे. तसे तर कुठलाही दरवाजा बंद होतोच. पण जेव्हा एखादा दरवाजा बंद होतो तेव्हा त्याला उघडण्याचा मार्ग सुद्धा तिथेच कुठेतरी आजूबाजूला असतो. मला आता इथे तो मार्ग शोधावा लागेल जेणेकरून बाहेर पडता येईल.”, पुन्हा एकदा स्वतःला धीर देत तो म्हणाला. 

अर्णवने खाली उतरत जाणाऱ्या पायऱ्यांवर टॉर्चचा प्रकाश टाकला. त्या पायऱ्या उत्तम अशा दगडाच्या बनलेल्या होत्या. पण इतकी शतकं उलटून गेल्यानंतरही त्यांच्यावर कुठेही चीर दिसत नव्हती. 
अंदाज घेत अर्णव हळूहळू खाली उतरू लागला. 

जसा जसा तो खाली जात होता तसं तसं आजूबाजूच्या वातावरणात कमालीचे बदल जाणवू लागले होते. जमिनीच्या वर जिथे उन्हाळ्याचे वातावरण होते तिथेच खालच्या भागात मात्र हाडे गोठवणारी थंडी जाणवत होती. 
 
पण तरीही एक विलक्षण गोष्ट होती की खालची हवा दमट, कोंदट किंवा गुदमरून टाकणारी नव्हती. उलट त्या हवेमध्ये ओल्या मातीचा आणि अजून कुठलातरी सुवास जाणवत होता. 

 अर्णव हळूहळू जवळपास 50 पायऱ्या उतरून खाली गेला. अचानक पायऱ्या संपल्या आणि त्याच्यासमोर विस्तीर्ण असा बोगदा दिसू लागला. त्या बोगद्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या भिंतींचं अर्णव जसं जसं निरीक्षण करत गेला तसा तसा त्याला धक्का बसला. 

त्या बोगद्यातील भिंतीवर फक्त कोरीव काम नव्हते तर तिथे मोठमोठ्या आकारांची भित्तिचित्रे काढलेली होती. ती चित्रे अर्णवणे आधी अभ्यासलेल्या चित्रांसारखी अजिबात नव्हती. त्या चित्रांमध्ये जिवंतपणा जाणवत होता. 
“हे कसं काय शक्य आहे?” , अर्णवला प्रश्न पडला. 

एका भिंतीवर उंच देखणा आणि कपाळावर चंद्रकोर असलेला दैवी पुरुष दाखवला होता…तर त्याच्यासमोर अक्राळ विक्राळ हातात विचित्र शस्त्र घेतलेला राक्षसासारखा दिसणारा दैत्य पुरुष होता. 

दुसऱ्या चित्रांमध्ये हवेत उडणारे पण पंख नसलेले असे काही यक्ष आणि शरीराचा अर्धा भाग सापाचा आणि अर्धा भाग माणसाचा असणारे मोठे नाग चितारलेले होते. 

अर्णव हाताने स्पर्श करून ती चित्रे पाहत होता. वास्तुकलेचा आत्तापर्यंत त्याने पाहिलेला हा अतिशय वेगळा आणि अद्भुत नमुना होता. ती चित्रे ज्या रंगांनी रंगवली होती ते रंग अंधारात चकाकत होते. 

अर्णवचे विज्ञानावर असीम श्रद्धा असणारे मन त्या एकेका गोष्टीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत होते. 
त्याच्या अंदाजानुसार ही चित्रे फॉस्फरस किंवा एखाद्या नैसर्गिक रेडिओऍक्टिव्ह पदार्थापासून तयार करण्यात आली असतील. त्या चित्रांमध्ये असणाऱ्या आकृत्यांचे डोळे इतके जिवंत होते की अर्णवला क्षणभर ते आपल्यावर नजर ठेवून आहेत असा भास झाला. 
  
तो बोगद्यातून हळूहळू पुढे गेला. आणि अचानक एका वळणावर समोरचा रस्ता संपला. 

आजूबाजूच्या भिंतींचे निरीक्षण करता करता अर्णवचे लक्ष समोर गेले. समोरचे दृश्य पाहताच त्याच्या हातातला टॉर्च खाली पडला. त्याने तो कसाबसा सावरला आणि तो पुढे बघू लागला. 

अर्णव च्या समोर एक अथांग विस्तीर्ण मैदान होते. त्याने वरच्या दिशेने नजर टाकली तर तिथे कैकपटींनी हिऱ्यासारखे चमकणारे दगड दिसत होते त्या दगडांमुळे परावर्तित होणारा प्रकाश हा निळ्या रंगाचा होता. त्यामुळे तिथे अंधार जाणवत नव्हता. 

सगळ्या गोष्टींचे निरीक्षण करताना अर्णवच्या लक्षात आलं की त्या प्रकाशाच्या विळख्यात एक संपूर्ण पण भूमिगत असलेले शहर वसलेले आहे. पण ते शहर कुठूनही उध्वस्त झालेले किंवा मोडकळीस आलेले नव्हते. तर ते शहर जिवंत असूनही विचित्र भासत होते. असं का वाटत होतं हे अर्णवला लवकरच लक्षात येणार होतं. 

त्या ठिकाणी पाषाणापासून बनवलेले मोठमोठे वाडे होते,चौक होते, नैसर्गिकरित्या तयार झाले आहेत असे वाटावे असे पाण्याचे स्त्रोत तयार करण्यात आलेले होते. त्या शहरातील वास्तुकला इतकी जास्त आधुनिक होती की वर्तमान काळातील वास्तुतज्ञांनासुद्धा स्वतःच्या कौशल्यावर शंका यावी. 
पण त्या ठिकाणी कुठेही आधुनिक यंत्रे नव्हती, वाहने नव्हती आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे विजेचे खांबही नव्हते. 
संपूर्ण शहरावर मात्र एका गूढ, रहस्यमयी अशा शांततेचा प्रभाव जाणवत होता. 

समोरच्या बाजूला त्या शहराचे मुख्य प्रवेशद्वार दिसत होते. अर्णव गोंधळून त्या सगळ्या दृश्याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करत होता. हा आपल्यासमोर निर्माण झालेला भास आहे की ही गोष्ट प्रत्यक्षात अस्तित्वात आहे या विचारांमध्ये त्याचे मन गोंधळले होते. 

 हळूहळू तो त्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दिशेने पुढे सरकला. तिथून आत गेल्यानंतर त्याने बघितलं की आत मध्ये एक मोठे पाण्याचे कारंजे होते. पण ते कारंजे चालू असूनही पाण्याचे थेंब मात्र हवेत एका विशिष्ट उंचीवर थांबलेले होते. जणू काही त्याला पॉज करण्यात आले होते. 

“पॉज” हा शब्द मनात उमटताच अर्णव चमकला त्याने भराभरा भरा पुन्हा एकदा आजूबाजूला नजर फिरवली आणि त्याच्या लक्षात आले की तिथल्या जीवसृष्टीला खरोखरच कोणीतरी पॉज केले होते. 
हवेत उडणारी धूळ स्थिर झाली होती. झाडांची पाने सुद्धा एका विशिष्ट दिशेने कललेल्या अवस्थेत होती. 
सर्वकाही आहेत असेच गोठून गेल्यासारखे होते. 

“ कुणी आहे का इथे?”, अर्णवने मोठ्या आवाजात प्रश्न विचारला. पण तिथल्या त्या गोठलेल्या शांततेत त्याचा आवाज कुणालाही ऐकू गेला नाही. 

अर्णव आता काहीसा घाबरला. पण आपल्यासमोर आलेल्या या नवीन आव्हानाला आपल्याला पुरून उरायचं आहे हे त्याच्या मनात निश्चित होतं. त्याने पुन्हा एकदा तोच प्रश्न विचारला. 

“ इथे कोणी आहे का? असं विचारण्याऐवजी मी कोणत्या काळात येऊन पोहोचलो आहे हे विचारणं जास्त योग्य ठरेल ना?”, एक धीर गंभीर आवाज अर्णवच्या पाठीमागून येत कानावर आदळला. 

अर्णव दचकून मागे वळाला. त्याच्यामागे तीन व्यक्ती उभ्या होत्या. त्या सर्व व्यक्ती शरीराने अंगापिंडाने मजबूत दिसून येत होत्या. त्यांच्या चेहऱ्यांवर एक वेगळेच तेज दिसत होते. त्यांचे कपडे मात्र प्राचीन काळातील सुती वस्त्रांसारखे होते आणि हातात कसल्याशा धातूचे कडे होते. त्यांच्यापैकी कोणाच्याही हातात कोणतेही शस्त्र दिसून येत नव्हते. पण त्या तिघांचाही ऑरा समोरच्याला धडकी भरेल असा होता. 

अर्णवणे नकळतच स्वतःच्या हातातला टॉर्च त्या तिघांच्या दिशेने फिरवला. त्यांचे क्षणभर निरीक्षण केल्यानंतर तो म्हणाला, “ तुम्ही कोण आहात? आणि इथे काय करत आहात? हा कुठला सेट आहे का? कसलं शूटिंग सुरू आहे?” 

अर्णवला अजूनही अतार्कीक गोष्टींवर विश्वास बसत नव्हता. त्यामुळे कुठे ना कुठेतरी तो स्वतःचे अंदाज खरे ठरवावेत असा विचार करत होता. 

त्या तिघांमध्ये जो पुरुष पुढे उभा होता, तो गालातल्या गालात हसला. त्याने अर्णवच्या हातातल्या टॉर्च चे निरीक्षण केले आणि म्हणाला, “ तुझ्या हातात हे जे खेळणे आहे त्याचा तुला इथे काहीच उपयोग होणार नाही. कारण हे आमचे जग आहे. आम्ही या जगाचे रक्षक आहोत. इथे फक्त आणि फक्त आमचीच सत्ता चालते.”

“ तुम्ही हे काय बोलत आहात? मी तुम्हाला कुणी अडाणी माणूस वाटलो का? मी पुरातत्व खात्याचा अधिकारी आहे. हे शहर जमिनीखाली किती काळापासून आहे? आणि मुळात तुम्ही इथे कसे काय राहत आहात? हे सगळं बेकायदेशीर आहे.”, अर्णव ने पुन्हा एकदा आपले अंदाज मांडण्याची धडपड केली. 

त्या व्यक्तीने अर्णवच्या खांद्यावर हात ठेवला. त्याचा स्पर्श जिवंत माणसाप्रमाणेच उबदार जाणवला. पण त्याच्या जवळ येण्याने अर्णवची बोलती मात्र बंद झाली होती. 

“ बेकायदेशीर? म्हणजे काय असतं? कसलं पुरातत्व खातं? कुठला अधिकारी? हे बघ सभ्यगृहस्था आम्हाला या शब्दांचे अर्थ माहित नाहीत तू ज्याला इतिहास समजतोस तो आमच्यासाठी आमचा वर्तमान काळ आहे. आम्ही गेल्या बऱ्याच काळापासून या दरवाज्याच्या मागे आहोत. पण आम्ही कधीही या शहराच्या बाहेर पाऊल ठेवलेले नाही. कलियुगाच्या सुरुवातीला आमचे हे शहर वसले होते. तेव्हापासून आजतागायत आम्ही याचे रक्षण करत आहोत.”

“ कलियुग? काहीही काय? असल्या भाकड कथा सांगून तुम्ही इतरांना फसवू शकता मला नाही. तुम्ही जे सांगत आहात ते असंभव आहे. विज्ञानाच्या नियमानुसार माणसाचे शरीर अन्न पाणी आणि सूर्यप्रकाशाशिवाय इतकी वर्ष जिवंत राहूच शकत नाही. आणि तुम्ही म्हणताय की तुम्ही या शहराच्या बाहेर पाऊल टाकलं नाही? माझा यावर विश्वास बसत नाही.”, अर्णवने ठामपणे त्याचे मत मांडले. 

“ तुझा विश्वास बसावा म्हणून मी तुला यातलं काहीच सांगितलेलं नाही. हे आमचं जग आहे आम्ही इथे राहत आहोत. तू आमच्या जगात बाहेरून प्रवेश केला आहेस. तू निरीक्षण केलंस तर या कारंजाच्या पात्रातून पडणारा थेंब गेल्या कित्येक वर्षांपासून असाच हवेत लटकत आहे. आमच्या या जगामध्ये कोणाचही वय वाढत नाही. इथे कोणालाही अन्न वस्त्र निवारा या गोष्टींची काळजी नसते. कारण कोणाला भूक लागत नाही आणि मुख्य म्हणजे कोणालाही मृत्यू येत नाही. आम्ही कित्येक काळापासून अनादिनाथाच्या छत्रछायेखाली सुरक्षित आहोत. पण…” बोलता बोलता अचानक तो पुरुष थांबला आणि जमिनीकडे खाली पाहू लागला
त्याचा चेहरा भीतीने काळा पडला होता. 

“ पण काय?? तुम्ही बोलता बोलता अचानक का थांबलात?”, अर्णवला आता त्याच्या बोलण्यात कुतूहल जाणवू लागले होते. 

“ इथला काळ जरी आमच्यासाठी थांबलेला असला तरी तो पूर्णपणे मृत झालेला नाही. दररोज रात्री जेव्हा वरच्या जगात मध्य रात्र असते. तेव्हा इथे या शहरात एक भयानक घटना घडते आणि त्याची किंमत वरच्या जगाला मोजावी लागते…”, त्या व्यक्तीने स्पष्टीकरण दिले. 

अर्णव ने आता त्याच्या नजरेला नजर भिडवत बघितले. त्याच्या डोळ्यांमध्ये अर्णवला एक वेगळ्या प्रकारची भीती जाणवली. 

सोबतच त्याच्या हेही लक्षात आले की विज्ञानावर असलेले विश्वासाच्या जोरावर तो ज्या गोष्टीला इतके दिवस भाकड कथा समजत होता. अशाच एका कथेचा तो आता भाग झाला आहे. 

कारण भूगर्भाखाली असलेल्या या ठिकाणी विज्ञानाची हद्द संपून अनाकलनीय अशा रहस्यांची सुरुवात झाली होती. 

पुढील भागात (भाग ३ मध्ये) 
अर्णवच्या मनातील अंदाज खरे ठरतील की अजून काही रहस्य त्याच्या समजूतींना खोटं ठरवतील? 
हे शहर अचानक भूगर्भाखाली कसे काय निर्माण झाले? की एखाद्या प्रचंड मोठ्या धक्क्यामुळे आधीच अस्तित्वात असलेले शहर जमिनीखाली गुडूप झाले आहे? 

क्रमशः...
19 जून 2026 (शुक्रवार) 


नमस्कार मंडळी 
कालगर्भ सिरीज मधली पुढची कथा आहे “शापित गर्भगृह” … 
 
ही कथा फेसबुक पेज, ब्लॉग आणि प्रतिलिपी वर वाचण्यास उपलब्ध होईल. 
तुमच्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे. 

2016 पासूनचे माझे लिखाण वाचायचे असेल तर ते प्रतिलिपी ह्या अँप वर उपलब्ध आहे. 

बाकी सगळं काही दत्तात्रेयार्पणमस्तू!!! शुभं भवतू!!!
स्वतःला शोधताना - गौरी हर्षल


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अनाहत भाग 1 - गौरी हर्षल

अनाहत भाग 2

अनाहत भाग 3