शापित गर्भगृह भाग 4
#कालगर्भ
#शापित_गर्भगृह
भाग ४: अर्णवचे रहस्य
राहुलची भयानक किंकाळी अर्णवच्या कानावर पडली तेव्हा त्याच्या काळजाचा भीतीने थरकाप उडाला.
पुढचा मागचा कुठलाही विचार न करता अर्णवने तो ज्या दिशेने आला होता त्या दिशेने धाव घेतली. जोरात धावत आल्याने त्याचा श्वास फुलला होता. छाती धडधडत होती आणि कपाळावरून घामाच्या धारा वाहत होत्या. पण अर्णवला सध्या स्वतःपेक्षा जास्त राहुलची काळजी वाटत होती. तो वेगाने जिन्यावरून चढू लागला.
ज्या माणसाला विज्ञानाशिवाय इतर कुठल्याही गोष्टीवर विश्वास न होता तो आज नकळतच एका अमानवीय, आणि भयंकर अशा शक्तीला नकळतच भिडायला निघाला होता.
“राहुल जिथे आहेस तिथेच थांब मी वरती येतोय.", आपला आवाज राहुल ला ऐकू जाईल की नाही याची पर्वा न करता अर्णव जीवाच्या आकांताने ओरडत होता.
मघाशी अर्णव खाली आल्यानंतर आपोआपच वरचा दरवाजा बंद झाला होता. आत्ता मात्र तोच दरवाजा उघडा होता. हे बघून अर्णवला आश्चर्याचा धक्का बसला.
त्या उघड्या दरवाजातून वरच्या गर्भगृहातील थंड वारा आणि बॅटरीवर सुरू असणाऱ्या लाईटचा मंद प्रकाश खाली येत होता. अर्णवने स्वतःचे शरीर कसेबसे त्या फटीतून बाहेरच्या दिशेने ढकलले. आणि तो वरती चढून गेला.
गर्भगृहात पूर्णपणे शांतता होती. पण ती शांतता सुखावणारी नक्कीच नव्हती तर ती शांतता एका अनाकलनीय वादळाचं अस्तित्व दाखवत होती.
अर्णव उठून उभा राहिला. त्याने आजूबाजूला पाहिले.
"राहुल?!" त्याचा आवाज थरथरला.
गर्भगृहाच्या एका कोपऱ्यात राहुलचे आधुनिक लेझर लेव्हलर आणि इतर उपकरणे विखुरलेली होती. जमिनीवर राहुलची बॅग पडली होती आणि त्या बॅगे शेजारीच... अर्णवच्या पायाखालची जमीन सरकली. जमिनीवर रक्ताचे काही ताजे थेंब पडले होते. ते थेंब गर्भगृहाच्या दरवाजापासून सुरू होऊन बाहेर जाणाऱ्या पायऱ्यांच्या दिशेने गेले होते.
अर्णवने धावत मंदिराबाहेर पाऊल ठेवले.
बाहेर रात्रीचे साडेबारा झाले असावेत. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांतून येणारा वारा आता अधिकच हिंस्त्र झाला होता. झाडांची पाने आपसात घासून एक भीतीदायक आवाज निर्माण करत होती. मंदिराच्या आवारात लावलेला मजुरांचा तात्पुरता कॅम्प रिकामा होता, कारण सगळे रात्रीच गावात गेले होते.
अर्णवने टॉर्चचा प्रकाश जमिनीवर टाकला. त्या रक्ताच्या थेंबांचा माग काढत तो मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या एका प्राचीन, पडक्या विहिरीपाशी येऊन थांबला.
विहिरीच्या कठड्यावर राहुलचा मोबाईल फोन पडला होता. स्क्रीन पूर्णपणे क्रॅक झाली होती, पण त्यावर अजूनही बॅटरीचे शेवटचे काही टक्के शिल्लक असल्याने स्क्रीन अंधुक चमकत होती.
अर्णवने तो फोन हातात घेतला. फोनच्या कॅमेरा ॲपचे रेकॉर्डिंग अजूनही चालू होते! राहुलने गायब होण्यापूर्वी काहीतरी रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला होता.
अर्णवने थरथरत्या हाताने ते रेकॉर्डिंग प्ले केले.
व्हिडिओमध्ये सुरुवातीला फक्त अंधार आणि राहुलचा घाबरलेला श्वास ऐकू येत होता.
राहुल कॅमेऱ्यात बघून बोलत होता, "सर! खाली जाणारा दरवाजा बंद झालाय... तुमचा फोन लागत नाहीये. अचानक इथे तापमान खूप कमी झालंय. देवळात काहीतरी वेगळाच आवाज येतोय... सर, मला भीती वाटतेय..." त्यानंतर व्हिडिओमध्ये एक मोठा वारा सुटल्याचा आवाज येतो.
गर्भगृहाच्या छतातून ती काळी, धुरासारखी महाकाय सावली खाली उतरताना दिसली. तिचे डोळे दोन लाल रंगाच्या निखाऱ्यासारखे चमकत होते. राहुल मोठ्याने ओरडला, त्याचा फोन हातातून खाली पडला.
कॅमेरा विहिरीच्या दिशेने फिरवला गेला आणि त्या सावलीने राहुलला हवेत उचलून, कोणत्याही वजनाशिवाय त्या अंधाऱ्या विहिरीच्या पोटात ओढून नेल्याचे दिसले. त्यानंतर रेकॉर्डिंग संपले.
हे सगळं बघितल्यावर अर्णव अक्षरशः शॉक झाला.
"हे वैज्ञानिकदृष्ट्या अशक्य आहे. एखादी सावली मानवी शरीराला कसं उचलून नेऊ शकते? तिचं वस्तुमान कसं असू शकतं?" अर्णवचा तार्किक मेंदू अजूनही या घटनेला भौतिकशास्त्राच्या नियमात बसवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होता.
तो तसाच धावत भूर्जेश्वर गावाच्या दिशेने गेला.
गावात पोहोचताच त्याला समजले की परिस्थिती केवळ मंदिरातच नाही, तर संपूर्ण गावात भयानक झाली आहे. गावातील सरपंच आणि काही लोक हातात मशाली आणि लाठ्या घेऊन चौकात जमा झाले होते. लोकांच्या चेहऱ्यावर भीती आणि संताप साफ दिसत होता.
"अर्णव साहेब! तुम्ही आलात? बरं झालं. आमच्या गावातून आज पुन्हा एक जण गायब झाला! पाटलांचा तरुण मुलगा विकास... घरात झोपला होता, अचानक खिडकीतून काळा धूर आत आला आणि विकास गायब झाला!" सरपंच ओरडून सांगत होते.
"सरपंच, शांत व्हा. माझ्यासोबत आलेला अधिकारी राहुलसुद्धा गायब झाला आहे," अर्णवने सांगितले.
गावातल्या एका वृद्ध पुजाऱ्याने, ज्यांचे नाव जनार्दन पंत होते, त्यांनी अर्णवकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यांत एक जुनी, विस्मृतीत गेलेली भीती होती. त्यांनी अर्णवचा हात पकडला आणि म्हणाले, "मी वर्षानुवर्षे सांगतोय या गावाला... भूर्जेश्वराच्या गर्भगृहाखाली जे दडलंय, त्याला छेडू नका! ती सावली दुसरी कोणी नाही, तो काळ-पुरुष आहे. जेव्हा मानवाचा लोभ वाढतो, तेव्हा तो वर येतो. गेल्या वीस वर्षांत या गावातून एकूण सत्तावीस लोक गायब झाले आहेत. आणि पोलीस? पोलीस म्हणतात ते पळून गेले किंवा वाघाने खाल्ले! साहेब, त्यांना वाघाने नाही, तर या देवळाच्या शापाने खाल्लंय!"
'वीस वर्षे... सत्तावीस लोक...' हे आकडे ऐकताच अर्णवच्या डोक्यात एक वीज चमकली. विज्ञानाचा विचार बाजूला ठेवून जर त्याने या पॅटर्नचा अभ्यास केला, तर त्याला एक भयानक वैयक्तिक सत्य आठवले. वीस वर्षांपूर्वी, अर्णव जेव्हा अवघा आठ वर्षांचा होता, तेव्हा त्याचे वडील — प्राध्यापक यशवंत देशमुख, जे स्वतः एक नावाजलेले इतिहासकार होते — याच भूर्जेश्वर मंदिराच्या परिसरातून एका रात्री अचानक गायब झाले होते. त्यानंतर त्यांचा कधीच पत्ता लागला नव्हता. पोलिसांनुसार त्यांनी आत्महत्या केली होती किंवा ते कुटुंबाला सोडून पळून गेले होते.
पण आज अर्णवला समजले होते की, त्याचे वडील पळून गेले नव्हते... त्यांनाही याच सावलीने ओढून नेले होते!
अर्णव आता गप्प बसू शकत नव्हता. हे आता केवळ एका सरकारी मोहिमेचे काम उरले नव्हते; हा त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या वैयक्तिक रहस्याचा आणि सूडाचा भाग बनला होता.
तो कोणालाही काही न सांगता पुन्हा मंदिराकडे धावला. त्या पडक्या विहिरीपाशी तो आला. जर ती सावली राहुलला घेऊन खाली गेली असेल, तर तो मार्ग नक्कीच त्या भूमिगत शहराकडे जात असणार. अर्णवने विहिरीच्या आत टॉर्च मारला.
विहीर कोरडी होती, पण तिच्या तळाशी एक भुयार दिसत होते. अर्णवने विहिरीला बांधलेली दोरी घट्ट पकडली आणि तो स्वतःला खाली झोकून देऊ लागला.
विहिरीच्या तळाशी पोहोचताच त्याला तेच परिचित, थंडगार वातावरण जाणवले. तिथल्या हवेत पुन्हा एकदा तोच अनाकलनीय गंध होता. तो भुयारातून पुढे सरकला आणि पुन्हा एकदा त्याच भव्य, गोठलेल्या भूमिगत शहराच्या प्रवेशद्वाराच्या जवळ येऊन उभा राहिला.
तिथे वेध आधीच त्याची वाट पाहत उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर दुःख होते.
"तू परत का आलास, परक्या माणसा? मी तुला सांगितले होते, काळाच्या नियमांना तू बदलू शकत नाहीस," वेध म्हणाला.
"मला तुमचे नियम शिकवू नकोस!" अर्णव संतापाने वेधची गचांडी धरत ओरडला.
"ती सावली माझ्या माणसाला घेऊन आली आहे. कुठे आहे राहुल? आणि वीस वर्षांपूर्वी माझ्या वडिलांनाही याच शहराने गिळंकृत केले होते ना? मला माझे वडील आणि राहुल जिवंत हवे आहेत, अन्यथा मी हे तुमचे संपूर्ण शहर सुरुंग लावून उडवून देईन!"
वेधने अर्णवचा संताप शांतपणे सहन केला.
त्याने अर्णवचा हात हळूच बाजूला केला आणि म्हणाला, "तुझा मित्र राहुल अजून जिवंत आहे. त्याला त्या गर्भ-चक्राच्या ऊर्जेसाठी पकडून ठेवण्यात आले आहे. आणि तुझ्या वडिलांबद्दल..." वेध क्षणभर थांबला, त्याने एक दीर्घ श्वास घेतला. "चल माझ्यासोबत."
वेध अर्णवला गर्भ-चक्र मंदिराच्या पाठीमागे असलेल्या एका अत्यंत सुरक्षित, पाषाणाच्या गुहेकडे घेऊन गेला. त्या गुहेच्या दारावर नागांची भव्य चित्रे होती. गुहेच्या आत एक पाषाणाची खाट होती, ज्यावर एक वृद्ध माणूस शांतपणे झोपलेला होता. त्याच्या शरीराभोवती निळ्या प्रकाशाचे वलय फिरत होते.
अर्णवने टॉर्चचा प्रकाश त्या चेहऱ्यावर टाकला... आणि अर्णवच्या पायाखालची जमीन पुन्हा एकदा हादरली.
त्या खाटेवर झोपलेला माणूस दुसरा कोणी नसून त्याचे वडील — प्राध्यापक यशवंत देशमुख होते! पण सर्वात धक्कादायक आणि विज्ञानाचा थरकाप उडवणारी गोष्ट ही होती की, वीस वर्षांपूर्वी अर्णवने आपल्या वडिलांना जसे पाहिले होते, ते आज वीस वर्षांनंतरही हुबेहूब तसेच दिसत होते! त्यांचे वय एका दिवसानेही वाढले नव्हते. त्यांचे केस पांढरे झाले नव्हते, की त्यांच्या चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या नव्हत्या. ते वीस वर्षांपूर्वीच्या काळाच्या चौकटीत जसेच्या तसे गोठलेले होते!
अर्णव धावत धावत त्यांच्याजवळ गेला, त्याने त्यांच्या खांद्याला हलवले, "बाबा! बाबा, उठा! मी अर्णव..."
पण यशवंत देशमुख यांनी डोळे उघडले नाहीत. त्यांच्या छातीची हालचाल अत्यंत संथ गतीने होत होती—साधारण एका मिनिटाला फक्त एक श्वास!
"ते उठणार नाहीत, अर्णव," वेध मागून म्हणाला. "ते जिवंत आहेत, पण ते या शहराचे कैदी आहेत. आणि आता तुझ्या मित्राचा, राहुलचाही नेमका हाच जिवंत मृतदेह होणार आहे. कारण आजची मध्यरात्र संपण्यापूर्वी, या शहराला एका विस्मृतीत गेलेल्या देवतेचा असा शाप लागू होणार आहे, ज्यातून संपूर्ण वरचं जग भस्मसात होणार आहे!"
अर्णवने आपल्या वडिलांच्या गोठलेल्या चेहऱ्याकडे पाहिले आणि मग बाहेर फिरणाऱ्या त्या रक्तरंजित गर्भ-चक्राकडे. त्याला समजले की, हे रहस्य केवळ एका भूमिगत शहराचे नसून, मानवजातीच्या विनाशाचे काउंटडाऊन होते.
पुढील भागात (भाग ५ मध्ये)
अर्णव हे सगळे गुढ रहस्य उलगडू शकेल का? ती सावली नेमकी कुठून येते आणि कुठे जाते हे त्याला लक्षात येईल का?
क्रमशः...
21 जून 2026 (शनिवार)
नमस्कार मंडळी
कालगर्भ सिरीज मधली पुढची कथा आहे “शापित गर्भगृह” …
ही कथा फेसबुक पेज, ब्लॉग आणि प्रतिलिपी वर वाचण्यास उपलब्ध होईल.
2016 पासूनचे माझे लिखाण वाचायचे असेल तर ते प्रतिलिपी ह्या अँप वर उपलब्ध आहे.
बाकी सगळं काही दत्तात्रेयार्पणमस्तु!!! शुभं भवतु!!!
स्वतःला शोधताना - गौरी हर्षल
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा